शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे : शिवनेरी किल्ला जुन्नर (Shivneri Fort Junnar) येथे १९ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त व त्यांच्या वाहनांची होणारी गर्दी पाहता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.

नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जातील. ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.

गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.