दिलासादायक : देशात महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक

नवी दिल्ली – भारतातील महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक झाली असून हे प्रमाण १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे झाले असल्याचे राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ (एनएफएचएस-५)मध्ये आढळून आले आहे. देशाच्या लोकसंख्याशास्त्रात झालेला बदल यातून प्रतिबिंबित झाला आहे.

‘हे लक्षात घेता, लिंग गुणोत्तर (Sex Ratio) १ हजारांपलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत आला असल्याचे आपण म्हणू शकतो’ असे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग, तसेच लैंगिक भेदभाव आणि विषमता यांच्याशी लढा यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना याचे श्रेय असल्याचे ते म्हणाले.

जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे. यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या (पीसी अँड पीएनडीटी अ‍ॅक्ट) अंमलबजावणीसारख्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

२००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले.