सात दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई द्या,अन्यथा गुन्हे दाखल करू; कृषीमंत्र्यांचा विमा कंपन्यांना इशारा

मुंबई – पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आणि येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे. पीक विमा योजनेसंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पीक विमा योजनेत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 84 लाख शेतकऱ्यांनी 2 हजार 312 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे, असं भुसे यांनी सांगितलं. या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे एनडीआरएफअंतर्गत केलेले पंचनामे गृहित धरून विमा कंपन्यांनी विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भूमिका भुसे यांनी यावेळी मांडली.

रब्बी हंगामाची नुकसानभरपाई अद्याप निश्चित झालेली नाही. वर्षभरात सुमारे 5 हजार 800 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरल्याचेही त्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात विमा रक्कम मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित विमा कंपनीने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी कृषीमंत्र्यांनी दिले.