कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करा; जगदीश मुळीक यांचे सर्व पक्षांना आवाहन

Pune – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब , उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि पुण्यातील सर्व पक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून केले आहे.

मुळीक म्हणाले, देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अनन्यसाधारण स्थान आहे. विकासकामात राजकारण केले जात नाही. सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात. तसेच लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते.’

मुळीक पुढे म्हणाले, ही परंपरा कायम राखीत कसबा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. बिनविरोध निवडणूक करणे हीच मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.मुळीक पुढे म्हणाले, भाजप आणि मित्रपक्षांनी अंधेरीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार दिला नाही. तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नाही. कसबा मतदारसंघात ही परंपरा कायम ठेवावी.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या दुःखद निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा राजकीय वारसा मुक्ताताईनी समर्थपणे पुढे चालविला. पुणे शहराच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. असं मुळीक यांनी म्हटले आहे.