बिलिंगच्या बाबतीत चांगल्या कामाबद्दल महावितरणचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : महावितरणच्या वीज देयकांच्या अर्थात बिलिंगच्या बाबतीत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १० लाख २२ हजार तक्रारी आल्या होत्या व ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २ लाख ७२ हजार इतकी कमी झाली आहे. बिलिंगमध्ये गुणात्मक सुधारणा दिसत असून अतिशय चांगले काम केल्याबद्दल आपण महावितरणचे अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी नागपूर येथे विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या दरम्यान सांगितले.

पनवेल (Panvel) तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकांच्या संदर्भात सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर व इतर सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना  उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) म्हणाले की, बिल देण्यासाठी मीटरचा फोटो काढला जातो. अचूक देयक देण्यासाठी मीटर वाचन अचूक होणे गरजेचे आहे. मीटरचे फोटो तपासणी करताना संपूर्ण राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण जानेवारी २०२२ मध्ये ४५.६ टक्के होते. ते प्रमाण नोव्हेंबर २०२२ मध्ये १.९ टक्के इतके कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२0-२१ मध्ये बिलिंग तक्रारी १० लाख २२ हजार इतक्या आल्या. त्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४ लाख ५८ हजार झाली. पंधरा डिसेंबर २०२२ पर्यंत बिलिंग तक्रारींची संख्या २ लाख ७२ हजारपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून ज्या मीटर रीडिंग एजन्सीच्या कार्याचा अहवाल असमाधानकारक होता अशा ७६ एजन्सींना बडतर्फ करण्यात आले तर तीन एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात आले. राज्यात सरासरी देयकांचे प्रमाणही कमी झाले आहे.त्यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यात मीटरच्या फोटो पडताळणीमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये अस्पष्ट फोटोंचे प्रमाण १२ टक्के होते ते नोव्हेंबरअखेर १.३ टक्के इतके कमी झाले. या तालुक्यात सरासरी देयकांचे प्रमाणही जुलै महिन्यातील ७.३ टक्क्यांवरून घसरून नोव्हेंबरमध्ये ५.७ टक्के इतके कमी झाले आहे. चुकीच्या मीटरवाचन आणि इतर त्रुटींबाबत या विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांना चालू आर्थिक वर्षात ६ लाख ५९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.