भाजपच्या वंदे मातरमला आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं; पटोले यांनी कार्यकर्त्यांना ‘हे’ आदेश दिले

मुंबई – खाते वाटपानंतर भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम (Vande Mataram) असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला आता भाजपच्या वंदे मातरमला आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे.राष्ट्रगीत- वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे, मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना आणि जनतेशी संवाद साधतांना ‘जय बळीराजा’ म्हणावे, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले आहेत.

जगाचा पोशिंदा बळीराजाच्या सन्मानार्थ आपण जय बळीराजा म्हणून आपल्या संभाषणाची सुरुवात करावी, असं नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.वंदे मातरमला आमचा विरोध नाही, असं सांगताना देशावर आमचं निस्सीम प्रेम आहे, आमच्यातही प्रखर राष्ट्रभक्ती आहे. पण जगाच्या पोशिंदा बळीराजाच्या सन्मानार्थ आम्ही ‘जय बळीराजा’ म्हणण्याचे आदेश दिल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.