‘काम कमी आणि जाहिरात ज्यादा करत असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे’

शिर्डी – काम कमी आणि जाहिरात ज्यादा असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका  माजी मंत्री पल्लम राजू  यांनी केली आहे. शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली.

यावेळी व्यासपीठावर प्रभारी एच. के. पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते म्हणाले की, कोरोना संकटात केंद्र सरकार पूर्णपणे असफल ठरले असून भारतामध्ये मोठी आर्थिक मंदी आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध सूडबुद्धीने काम केले जात आहे. या सरकारला अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव असून शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांच्या विरोधी असणारा केंद्र सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत बाळासाहेब थोरात यांना मोठी ताकद द्यावी.

आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, डिजिटल नोंदणी अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मोठी संधी आहे. प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हु’ लड सकती हु’ हे अभियान सुरू केले असून महिलांना काँग्रेस पक्षामध्ये मोठी संधी आहे. तर सचिव बी. एम. संदीप म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसचे काम चांगले सुरू आहे. काँग्रेसला अधिकाधिक तरुणांपर्यंत घेऊन जात डिजिटल अभियान जास्त प्रभावी होण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्त्यांनी काम करावे.