कंगना राणावत विरोधात कॉंग्रेसतर्फे पुण्यात आणखी एक तक्रार दाखल

पुणे – सिनेअभिनेत्री कंगना राणावतने भारतीय स्वातंत्र्यलढ्याबाबत नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पुण्यात कॉंग्रेसतर्फे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. कॉंग्रेसचे सोशल मिडिया समन्वयक व पुणे जिल्हा प्रभारी चैतन्य पुरंदरे व ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद गवंडी यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले घरदार सोडून स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. परंतु कंगनाने आक्षेपार्ह विधान करून या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असून देशभरात संतापाची लाट आहे.

दरम्यान, सामाजिक सलोखा बिघडू नये व जनतेच्या दुखावलेल्या भावना लक्षात घेऊन कंगना विरोधात PASA कायदा, १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.