काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार – यशोमती ठाकूर 

मुंबई – गांधी परिवार राजकारणाच्या केंद्रस्थानी नसला की भाजपचं काम सोपं होणार आहे. सगळी मांडणी त्या दृष्टीकोनातून सुरू आहे. आज ही काँग्रेस देशातील एक मजबूत विरोधी पक्ष आहे. काँग्रेसच्या विधानसभांमधल्या जागा आणि शक्ती सातत्याने वाढतेय. काही ठराविक निवडणूक निकालांचं विश्लेषण केले तर काँग्रेसच्या जागा अकार्यक्षमतेमुळे नव्हे तर द्वेषाच्या राजकारणाच्या नव्या पेरणी मुळे घटल्या आहेत.असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या,  काँग्रेसच्या घटत्या जागा हा काँग्रेसच्या चिंतेचा विषय असण्याबरोबरच भारताच्या बदलत्या सामाजिक-राजकिय-धार्मीक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. काँग्रेस आपल्या तत्वांपासून हलत नाही, निवडणुकांमधले पराभव हे यशाचं मानक नाहीये. लढणं, उभं राहणं, तडजोड न करणं हे यशाचं मानक आहे. देशातील अनेक प्रादेशिक-राष्ट्रीय पक्षांनी अनैसर्गिक तडजोडी केल्या, पण काँग्रेस आणि काँग्रेसचे काही जुने मित्रपक्ष सदैव संघपरिवाराच्या विरोधात ठाम राहिले. त्याची किंमत निवडणुकीतील जागाच काय प्राण देऊनही आम्ही चुकवू.. आम्ही निर्भय आहोत, निडर आहोत, ठाम आहोत. सुदृढ भारतासाठी आम्हीच पर्याय आहोत. काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारतीयत्व म्हणजेच काँग्रेसचा विचार.

द्वेषाचं राजकारण जो पर्यंत आपल्या दारापर्यंत येत नाही तो पर्यंत ते फार आकर्षक वा़टतं. लक्षात ठेवा, अशा राजकारणाचे काही दिवस-वर्षे असतात. मात्र सोहार्द-प्रेम, लोकशाही, भेदभाव विरहीत समाज, माणूसकी ही शाश्वत कल्पना आहे. ती कधीच मरू शकत नाही. काँग्रेस त्या कल्पनेचा अविष्कार आहे. समाजातील बुद्धीवंतांनी खोट्या प्रचाराला बळी पडून तत्कालिक विश्लेषण करू नये. दूरदृष्टीने पाहा, काँग्रेसचं असणं आणि गांधीचं राजकारणात असणं याचं महत्व तुम्हाला पटेल.असं त्या म्हणाल्या.