काँग्रेसच्या बड्या नेत्याने राजकारणातून घेतला ब्रेक, कारण आहे एक व्हायरल व्हिडिओ

अहमदाबाद – गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांनी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणातून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. या काळात काही महिने राजकारणापासून दूर राहणे हा त्यांचा स्वतःचा निर्णय असल्याचे काँग्रेस नेते सोलंकी यांनी सांगितले. त्याचबरोबर आता दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इतर मागासलेल्या समाजातील लोकांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी काही महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून ब्रेक घेऊन सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या काळात मी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इतर मागासलेल्या समाजातील लोकांना भेटण्यासाठी अधिक वेळ देईन, असेही सांगितले. पक्षाच्या सूचनेनंतर सोळंकी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, ‘मला हायकमांडकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही’, असा दावा सोलंकी यांनी केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, सोलंकी यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेश्मा पटेलला बातमी मिळाली होती की तिचा पती भरतसिंह सोलंकी एका महिलेसोबत एका खोलीत बंद आहे. दरम्यान, रेश्मा पटेल काही लोकांसह तेथे पोहोचली आणि सोलंकी सिंगला रंगेहाथ पकडले. भरतसिंह सोलंकी आणि त्यांची पत्नी रेश्मा यांच्यात कायदेशीर लढाईही सुरू आहे.