दोस्तीत कुस्ती : लातूरमधील कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई   – लातूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन देतानाच एक चांगला निर्णय घेतल्याबद्दल प्रवेशकर्त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. काल लातूर जिल्हयातील कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपले विचार मांडले.

फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर पवारसाहेब काम करत पुढे जात आहेत. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची धुरा आज आम्ही सांभाळत आहोत. पक्षाची स्थापना झाल्यापासून सत्तेत राहिलो आहे. मधली पाच वर्षच विरोधी पक्षात राहिलो असल्याचे अजित पवार म्हणाले.

संघटना पुढे नेत असताना सर्वधर्मसमभाव राखून चालले पाहिजे. ८२ वर्षातील पवारसाहेबांकडे सर्व तरुण जाऊन चर्चा करतात. असा एकमेव नेता आपल्याजवळ आहे. राज्यसरकार मोठमोठ्या योजना देण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या राज्यात पाण्यासाठी १५ हजार कोटीच्या योजना घेतल्या आहेत असेही अजित पवार म्हणाले.

नव्या उमेदीने लातूर जिल्हयात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करुया. कार्यकर्त्यांकडून चुकीचे कृत्य किंवा वर्तन होऊ नये किंवा त्यांच्या वक्तव्याने कोणताही घटक नाराज होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

अनुभवाचा फायदा पक्षाला होऊन लातूर जिल्हा भक्कमपणे उभा राहिल – जयंत पाटील

आपल्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल आणि लातूर जिल्हा भक्कमपणे उभा राहिल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जनाधार वाढवायचा असेल तर असे नेते पक्षात आले पाहिजेत. लातूर विकासासाठी तुमचा अनुभव निश्चितपणे कारणीभूत ठरेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

लातूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, प्रशांत घार यांच्यासह औसा तालुक्याचे एमआयएमचे नेते अफसर अब्बास शेख, माजी नगरसेविका छाया चिंदे, जलीलनाना शेख, उस्मान शेख, ॲड. प्रदीप गंगणे, ॲड. अभिजीत मगर आदींसह इतरांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे जयंत पाटील यांनी यावेळी स्वागत केले.