वा रे पठ्ठ्यानो…! महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते गोव्यातील जनतेला देत आहेत इंधन दरवाढ कमी करण्याचे आश्वासन

पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय पक्षांकडून जनतेला विविध आश्वासने दिली जात आहेत. महागाईमुळे जनता त्रस्त असल्याचे पाहून राजकीय नेते जनतेला विविध आश्वासने देत आहेत. यापैकी एक आश्वासन जे प्रामुख्याने भाजपचे विरोधक देत आहेत ते आश्वासन म्हणजे पेट्रोल-डीझेल दरवाढ कमी करण्याबाबतचे आश्वासन दिले जात आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पणजीत पत्रकार परिषद घेवून महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करा, असे सांगितले. मोदी सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. याचा परिणाम बाजारावर झाला आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. पण मोदीजी अनेक करांच्या लुटलेल्या पैशातून पेट्रोल पंपावर आणि वर्तमानपत्रात आपल्या जाहिराती दाखवण्यात व्यस्त आहेत. असे त्यांनी नजरेस आणले.

पुढे बोलताना त्यांनी गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांवर पोहोचले आहेत असा दावा करत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन आम्ही देतो असं ते म्हणाले. दरम्यान, गोव्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्रात कॉंग्रेसची सत्ता असून देखील इंधनाचे भाव गगनाला भिडले असताना चव्हाण हे कोणत्या तोंडाने गोव्यातील जनतेला दर कमी करण्याचे आश्वासन देत आहेत हा संशोधांचा विषय आहे.

जर पाहायला गेलं तर काँग्रेस सत्तेत असलेल्या महाराष्ट्रापेक्षा पेक्षा गोव्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. गोव्यात पेट्रोल ९६ रुपये प्रति लिटर आहेत तर डिझेलचा दर ८७ रुपये प्रति लिटर इतका आहे. याउलट महाराष्ट्रात डिझेल ९४ रुपये आणि पेट्रोल 109 रुपये इतके महाग आहे. त्यामुळे चव्हाण यांनी आपला पक्ष सत्तेत असलेल्या राज्यातील भाव आधी कमी करून दाखवावेत आणि मग गोव्यात इंधन दरांच्या बाबत आश्वासन द्यावे अशी चर्चा होताना दिसत आहे.