‘भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत’

पुणे : ‘पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

कुमार केतकर म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.’

‘नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,’ असेही केतकर यांनी नमूद केले.

हे देखील पहा