Shivaray Kulkarni | मोदींच्या आनंदोत्सवाला प्रतिसाद हा काँग्रेसचा पोटशूळ; शिवराय कुळकर्णी यांची टीका

Shivaray Kulkarni | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त राजकमल चौकातील आनंदोत्सव कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व आनंदोत्सवाने काँग्रेसचे धाबे दणाणले असून त्या पोटशूळापायी काँग्रेसने भाजपावर पोस्टर फाडल्याचे खोटे खापर फोडणे सुरू केले असल्याची टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivaray Kulkarni) यांनी केली आहे.

भाजपावर खोटी टीका करून काँग्रेस आपले पाप झाकू शकत नाही. खा. बळवंत वानखडे यांच्या विजयोत्सवात केवळ राजकमल चौकातच नव्हे तर नांदगाव पेठ, बडनेरा, अचलपूर या सर्व ठिकाणी कसे कसे अश्लील हावभाव केल्या गेले याचे व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाले आहे. तुमचे हे “मोहब्बत का दुकान” संपूर्ण जिल्ह्याने चांगलेच अनुभवले. या संतापजनक घटनेनंतर नंतर कारवाई करा, असे थातुरमातुर पत्रक काढून काँग्रेस आपल्या दुष्कृत्यावर पडदा टाकू शकत नाही. बुंद से गयी वो हौद से नही आती ! काँग्रेसच्या विजयोत्सवाने अमरावतीच्या संस्कृतीला कलंकित केले आहे. अशा प्रकारच्या हावभावांना चिथावणी कोणी दिली, हे संपूर्ण जिल्ह्याला चांगले माहीत आहे. जनतेत आलेल्या संतप्त प्रतिक्रिये वरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस भाजपावर आरोप करीत आहे. काँग्रेसच्या विजयोत्सवातील अश्लील हातवारे, अर्वाच्य शिवीगाळ देखील मागासवर्गीय महिलेचा अपमान करणारेच होते, याचे भान काँग्रेस नेत्यांनी ठेवावे. सर्व गुंड, अवैध धंदेवाले, रेतीचोर काँग्रेसच्या विजयोत्सवात दहशत घालत होते. पोलिसांना साधे निवेदन देऊन हात झटकल्याची कृती काँग्रेस नेत्यांनी केली. मात्र, अमरावतीकरांचा अपमान होत असताना काँग्रेस नेते मूग गिळून या दुष्कृत्याचा आनंद लुटत होते. काँग्रेसने अमरावतीतील एका विजयाने हुरळून जाऊ नये. त्यांचे खरे रूप पहिल्याच विजयात जनतेच्या लक्षात आले आहे.

मोदींचा विजयोत्सव पार पडल्यावर खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी भाजपाने तात्काळ केली. कारण त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपाचा आनंदोत्सव कार्यक्रम संपल्याची अधिकृत घोषणा करून सर्व कार्यकर्ते रवाना झाल्यानंतर हा प्रकार घडला. कार्यक्रमस्थळी तैनात असलेल्या पोलीसांना देखील कार्यक्रम संपवून भाजपा कार्यकर्ते रवाना झाल्यावर हा प्रकार घडल्याची कल्पना आहे. आम्ही रात्रीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून या विषयीची स्पष्ट कल्पना दिलेली होती. पोलिसांनी पोस्टर प्रकरणी जी काही कारवाई केली त्याला भाजपाने आडकाठी न आणता सहकार्य केले. या घटनेनंतर पोलिसांनी व मनपाने शहरातील भाजपाचे सर्व फलक जमा केले. त्यालाही भाजपा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

काँग्रेसने भाजपावर आरोपबाजी करण्याचे खरे कारण पोस्टर फाडणे नसून मोदीजींच्या शपथविधीला अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी जो प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादाचा पोटशूळ आहे. सर्वत्र पिवळ्या माती ऐवजी गुलाल उधळला गेला याने काँग्रेस बेचैन झाली आहे. भाजपावर खोटे आरोप करून काँग्रेस आपले पाप झाकू शकत नाही, असे देखील शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप