मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे; संजय राऊत यांचा आरोप 

 मुंबई : मागासवर्गीय (Backward class) असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (Navnet Rana) यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यात असतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanajay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागले असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी म्हटले.