स्मार्ट सिटी प्रकल्पातील दुर्बल घटकांसाठीचे बांधकाम प्रगतीपथावर; बावनकुळेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचे उत्तर

मुंबई – नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत “होम स्विट होम” या नगररचना परियोजनेत दुर्बल घटकांकरीता बांधण्यात येत असलेल्या घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण न होण्यामागचे कारण विचारले असता एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

तीन वर्षापूर्वी मौजा भरतवाडा, पारडी आणि पूनापूर भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. एकूण १७३० एकर क्षेत्रात १०२४ घरे बांधण्याचे तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे यावेळी ठरले होते. त्यानंतर योजनेच्या बांधकामास सुरुवात झाली. परंतु प्रकल्पग्रस्तांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. इतकेच नव्हे तर ज्या प्रकल्पाग्रस्तांच्या घरांचे बांधकाम होणार होते ते देखील थंडबस्त्यात आहे. यासंदर्भात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न उचलून धरला. तर नगररचनेचे नियोजन नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहत धोरणानुसार करण्यात आले आहे. त्यातील ४० टक्केपेक्षा जास्त जागा बाधित असल्यास २०१७ च्या रेडी रेकनरच्या दराने दुप्पट मोबदला देणार असल्याचे आणि पूर्ण जागा रस्त्यामध्ये बाधित असल्यास ६० टक्के क्षेत्रफळाचा नवीन भूखंड प्रकल्पबाधितास देणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ज्यांच्याकडे भूखंडाचे वैध दस्ताऐवज उपलब्ध नाही पण पूर्ण घर बाधित होत असेल अशा प्रकल्पबाधीताना पुनर्वसन धोरणांतर्गत घरे देणे प्रस्तावित आहे. या घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले.