अभिनेत्री कंगना रनौतची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट 

मुंबई : नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून वादात असणाऱ्या कंगना रणौतने 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने अलीकडेच केलं होतं. त्यावरून तिच्यावर चौफेर टीका झाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच कंगनाने नवा वाद ओढवून घेतला आहे.

इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शीख समुदायातील लोक आक्रमक झाले आहे. त्यामुळे कंगना रनौतच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली आहेत. त्यासोबत कंगनाविरोधात नारेबाजी देखील करण्यात आली. कंगनाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार करा अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात येत आहे. कंगनाविरोधात रविवारी शीख समुदायाकडून मुलुंडमधील पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे.

कंगनाचे ट्विटर अकाउंट हटवण्यात आले असले तरीही ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची मतं व्यक्त करताना दिसते. कंगनाकडून इंदिरा गांधींची प्रशंसा करताना संपूर्ण शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.