राष्ट्रवादीचे नगरसेवक घाबरल्याने सोयीस्कर प्रभाग रचना ?, सर्वपक्षीय इच्छुक आक्रमक !

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहचू लागली आहे. कोणता प्रभाव कसा होणार याची चर्चा सुरू असताना १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेच्या ५८ प्रभागांची नावे जाहीर झाली. परंतू, राष्ट्रवादीचे नगरसेवक घाबरल्यामुळे सोयीस्कर प्रभाग रचना केल्याचा आरोप करत औंध, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने आपल्या हिशोबाने सोयीस्कर प्रभाग रचना केली. त्यामुळे, याच प्रभागातून शिवसेनेचे दोन ते तिन इच्छुक उमेदवार असून त्यांना राष्ट्रवादी कशाप्रकारे न्याय देणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

बाणेर, बालेवाडी या गावांचा महापालिकेमध्ये सामावेश झाल्यापासून येथिल डीपी देखील एकच आहे. नैसर्गिक रित्या ही गावे एकमेकास लागून आहेत. तसेच नव्याने समाविष्ट झालेले सुस व म्हाळुंगे ही गावे देखिल बाणेर व बालेवाडी सीमेलगत आहेत. परंतू, नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचना मध्ये प्रभाग क्रमांक १२ औंध बालेवाडी व प्रभाग क्रमांक १३ बाणेर, सुस, म्हाळुंगे असा प्रभाग करण्यात आल्यामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, सुस, व म्हाळुंगे गावांमधील सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय जनता पक्षातील विद्यमान तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांचे रहाण्याचे ठिकाण बालेवाडी-औंध प्रभागांमध्ये आले आहे. तसेच सर्वपक्षीय बहुसंख्य उमेदवारांचे रहाण्याचे ठिकाण बालेवाडी औंध प्रभागांमध्ये आल्यामुळे बाणेर, सुस, म्हाळुंगे प्रभागासाठी प्रभागा बाहेरचेच बहुसंख्य उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

डिसेंबर महिन्यात बाणेर, सुस, म्हाळुंगे प्रभागाची रचना लिक झाल्यामुळे परिसरातील काही नागरिकांकडून मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर काही दिवसांपुर्वीच न्यायालयाने स्पष्टीकरणही दिले होते. नैसर्गिक रित्या बालेवाडीचा औंध गावाशी कोणत्याही पद्धतीने संबंध येत नाही. परंतू, प्रभाग रचनेमध्ये बालेवाडी व औंध ही दोन गावे जोडण्यात आली. तसेच बाणेर, सुस, म्हाळुंगे या गावांमध्ये पुणे महापालिकेतील एकमेव दोन नगरसेवकांचा प्रभाग करण्यात आला. याविरोधात बाणेर परिसरातील नागरिकांनी निवडणूक आयोग व हायकोर्टामध्ये तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, बालेवाडी- औंध आणि सुस, म्हाळुंगे, बाणेर येथून शिवसेनेचे तिन इच्छुक उमेदवार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार, दुसरीकडे राष्ट्रवादीची सोयीस्कर प्रभाग रचना आणि तिसरीकडे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अशा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवारांना न्याय देणार की? शिवसेनेचे उमेदवार भाजपला छुपा पाठिंबा देणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रभाग रचनेमध्ये बाणेर परिसरातील राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. मागील २०१७ साली हे ज्येष्ठ नगरसेवक अत्यंत कमी मताच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीतील धोका बघून या नगरसेवकांनी स्वत: साठी सुरक्षित प्रभाग करून घेतला, असा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.