एमआयडीसी शेजारील ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करा – ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई – महाराष्ट्रातल्या एमआयडीसी शेजारच्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यासंदर्भात धोरण करण्याची मागणी अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज विधानसभेतील एका लक्षवेधी सूचनेच्या चर्चेवेळी केली.

विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एमआयडीसी संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत ॲड. यशोमती ठाकूर बोलत होत्या. एमआयडीसी मुळे त्या शेजारच्या ग्रामपंचायती आणि तिथल्या ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीतल्या आस्थापना ऐकत नाहीत, त्याचा त्रास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना होत असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती एमआयडीसीच्या जवळ आहेत, त्यांचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची मागणीच त्यांनी यावेळी केली. एमआयडीसीच्या जवळील ग्रामपंचायतींचे शहरीकरण झालेले आहे, त्या ग्रामपंचायतींना कर मिळत नाही, या ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी एखादे धोरण करा, अशी मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली.

ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मागणीवर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एमआयडीसी शेजारील ग्रामपंचायतींनी नगरपंचायतीत रूपांतरीत होण्यासंदर्भातला प्रस्ताव दिला तर त्यावर सकारात्मक निर्णय घेता येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त अशा ग्रामपंचायतींच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवू, असे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले.