महावितरणच्या अधिकाऱ्यास धक्काबुक्की; थकबाकीदार वीजग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृत वीज वापरणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या अधिकाऱ्यास धक्काबुक्की व वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी थकबाकीदार आरोपीविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंचर उपविभाग अंतर्गत लोणी (ता. आंबेगाव) येथील संजय लक्ष्मण पडवळ या ग्राहकाचा वीजपुरवठा ९ हजार ६९० रुपयांच्या थकबाकीमुळे २०१९ मध्ये महावितरणकडून कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. तरीही एका सर्व्हिस वायरद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु असल्याची बाब महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १९) केलेल्या तपासणीमध्ये निदर्शनास आली व पुढील कारवाईमध्ये हा अनधिकृत वीजवापर तत्काळ खंडित करून सर्व्हिस वायर ताब्यात घेण्यात आली.

त्यानंतर दुपारी उपकार्यकारी अभियंता गेटमे हे कार्यालयीन वाहनाने व इतर सहा कर्मचारी आपापल्या वाहनाने लोणी परिसरात सरकारी कर्तव्य बजावत असताना आरोपी संजय पडवळ याने बोलेरो जीप रस्त्यावर आडवी लावून गेटमे यांना अडविले. वीजपुरवठा का खंडित केला म्हणून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. वाहनासकट जाळून टाकण्याची धमकी दिली व दगडफेक केली. यात वाहनाची समोरील काच फुटली. आरोपीने महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करीत कार्यालयीन कागदपत्रे फाडून टाकले.

या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात महावितरणकडून फिर्याद दाखल करण्यात आली व पोलीसांनी आरोपी संजय लक्ष्मण पडवळ विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरु आहे.

हे ही पहा: