मेस्सीला मिळू शकतो रोनाल्डोपेक्षा दीड पट जास्त पगार, लवकरच भिडू शकतात दोघे दिग्गज

Ronaldo vs Messi: पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldo) अर्जेंटिनाला त्याच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता बनवणारा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आता सौदी अरेबियाच्या लीगमध्ये खेळू शकतो. रोनाल्डो अलीकडेच सौदी अरेबियाच्या अल नसर (al nasar Club) या क्लबशी जोडला गेला आहे. रोनाल्डोने क्लबसोबत 2.5 वर्षांचा करार केला आहे आणि तो 2025 पर्यंत अल नसरकडून खेळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला या डीलमध्ये 200 मिलियन युरो मिळाले आहेत.

फिफा विश्वचषकाच्या (FIFA World Cup) अगदी आधी रोनाल्डोने पियर्स मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीत त्याचे जुने क्लब प्रशिक्षक एरिक टेन हाग यांच्याविरुद्ध विधाने केली. यानंतर त्याचा जुन्या क्लबसोबतचा करार मुदतीपूर्वीच संपुष्टात आला.

रोनाल्डो अल नसरचा भाग बनल्यानंतर, मेस्सी आणि रोनाल्डोमध्ये कोणताही सामना होण्याची शक्यता संपली होती. कारण मेस्सी पीएसजी क्लबकडून खेळतो आणि हे दोन संघ वेगवेगळ्या लीगचा भाग आहेत. मात्र, आता हे दोघे 19 जानेवारीला होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात अल हिलाल (al hilal) आणि अल नसर संघ पीएसजीविरुद्ध सामना खेळणार आहे.

आता मेस्सीही सौदी अरेबियाच्या लीगचा भाग बनण्याची शक्यता आहे. रोनाल्डोचा क्लब अल नसरचा प्रतिस्पर्धी क्लब अल हिलाल मेस्सीला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल हिलाल मेस्सीला दरवर्षी 279 दशलक्ष युरोपेक्षा जास्त पगार देण्यास तयार आहे. मेस्सीचा पीएसजीसोबतचा संबंध उन्हाळ्यात संपुष्टात येणार आहे.

बार्सिलोनाचा माजी कर्णधार मेस्सीने कतार विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आणि गोल्डन बॉलही जिंकला. पीएसजीमध्ये परतल्यावर, मेस्सीने अँजर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गोल केला, ज्यामुळे संघाला 2-0 ने विजय मिळवून दिला. मेस्सीच्या 72व्या मिनिटाला गोल करण्याबरोबरच पाचव्या मिनिटाला पॅरिसच्या ह्युगो एकिटिकेने गोल केला. जर अल हिलालने मेस्सीसोबत करार केला तर हा लीगमधील सर्वात मोठा करार ठरू शकतो. यासोबतच मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात टक्कर होण्याचीही शक्यता बळावली आहे.