ही आग वाढतच जाणार, अग्निपथ योजनेवरुन संजय राऊतांची  टीका 

मुंबई –  केंद्र सरकारने आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आंदोलक तरुण करत आहेत.

आंदोलकांवर प्रशासनाकडून कारवाईही केली जात आहे. आतापर्यंत, यूपीच्या 4 जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी 6 एफआयआर नोंदवले आहेत, तर 260 लोकांना अटक केली आहे. वाराणसीमध्ये सर्वाधिक ३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्याचवेळी, बलियामध्ये सर्वाधिक अटक करण्यात आली असून, आतापर्यंत येथे 109 जणांना अटक करण्यात आली आहे.

या सैन्यभरती योजनेवर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला सुनावलंय. अग्निपथ (Agnipath) योजनेतून ठेकेदारीवर भरती केल्यास संपूर्ण सैन्यदलाची प्रतिष्ठा रसातळाला जाईल, असं म्हणत ही आग वाढतच जाणार असल्याचं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या अग्निपथ या सैन्यभरती योजनेवर देशभरातील विविध भागात टीका होताना दिसत आहे. 4 वर्षांच्या कंत्राटावर ही सैन्यभरती होणार असून त्यानंतर नोकरीची हमी नाही किंवा पेन्शनची सुविधा नाही. रँक नाही, यामुळे योजनेत भरती झालेल्या तरुणांचं नुकसान होणार अलल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तर शिवसेनेनं देखील जोरदार हल्लाबोल केलाय.