अजितदादा म्हणाले गर्दी करू नका पण राष्ट्रवादीच्या आमदार महाशयांनी आदेशाला थेट ‘घोडा’चं लावला !

पुणे : राज्यात कोरोनाचे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर नवाब मलिक यांनी माहिती दिली.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमाला जाणारच नसल्याचे स्पष्ट केलय. तसे आदेश त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील दिले आहेत. पण राष्ट्रवादीचे आमदार, कार्यकर्ते अजित पवारच्या आदेशाला गांभीर्याने घेत नाहीत किंवा आता अजित पवार यांचे आदेश पाळले जात नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असं म्हणण्याची वेळ आता खुद्द राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनीच आणलीय.

अशोक पवार यांनी सणसवाडीत कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत, घोड्यावरुन मिरवणूक काढल्याचे पहायला मिळाले. पुणे जिल्हा बँकेवर संचालकपदी निवड झाल्याच्या आनंदात अशोक पवार यांना कोरोनाचा विसर पडलाय असच दिसतंय. जिकडे नजर जाईल तिकडे गर्दीचं गर्दी, सोशल डिस्टसिंगचा फज्जा, आपल्याच सरकारच्या नियमांचे तीन तेरा आणि मास्कचा विसर, हे सारं काही राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांच्या मिरवणुकीत पाहायला मिळालं.

एकीकडे आरोग्यमंत्री, मुख्ययमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सगळेच सामान्य जनतेला कोरोनाचे नियम पाळण्याचे डोस देत आहेत आहेत. पण दुसरीकडे दिव्याखालीच अंधार असल्याचे या नेत्यांना दिसत नाही का ? असे विचारण्याची वेळ आली आहे. आता सामान्य जनतेवर कारवाई करणारं महाविकास आघाडीचं सरकार राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांवर कारवाईची हिंमत दाखवणार का ? हे पाहणं औस्त्युक्याचे ठरणार आहे.