सध्या भाजपकडून मनसेचा वापर चालू आहे; राष्ट्रवादीची टीका

मुंबई – राज्यात सध्या भाजप मनसे युतीबाबत जोरदार चर्चा होत असून महाविकास आघाडीतील नेते हे या मुद्द्यावरून सातत्याने या दोन्ही पक्षांवर टीका करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)यांनी भाजप-मनसेवर (BJP-MNS) टीका केली.

मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे अशी जोरदार टीका प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

मनसेची तशीही मते भाजपला मिळणार नाही म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजप घाबरत आहे. भाजपची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची इच्छा फार आहे पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, आंदोलनाला खतपाणी कुणी घातले… त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली… न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते… याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील (Dilip Valse Patil) सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी त्यांच्या बंगल्यावर संवाद साधला असता पवारसाहेबांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले. पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. या प्रकरणाचा तपास कोणत्या स्टेजला आला आहे याचा नक्की तपशील माहीत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.