CWG 2022 : पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकले; कॅनडाच्या मिशेल लीचा केला पराभव

नवी दिल्ली – राष्ट्रकुल 2022च्या (Commonwealth Games 2022) शेवटच्या दिवशी, भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले. तिने बॅडमिंटन महिला एकेरीच्या सामन्यात कॅनडाच्या मिशेल लीचा ( Michelle Li) पराभव करून सुवर्णपदक जिंकले. याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यातही सिंधूने चमकदार कामगिरी केली होती. तो कायम ठेवत त्याने सुवर्ण जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारतासाठी हे 19 वे सुवर्णपदक आहे.

सिंधूने अंतिम सामन्यात कॅनडाची शटलर मिशेल ली हिचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह तिने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. सिंधूने फायनलच्या पहिल्या गेमपासूनच आघाडी घेतली. तिने शानदार सुरुवात केली आणि पहिला गेम 21-15 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्येही ती बरोबरीने खेळत होती. पण यादरम्यान मिशेलही आघाडी घेण्याचा प्रयत्न करत होती, तरीही ती यशस्वी होऊ शकली नाही. सिंधूने दुसरा गेमही जिंकला. तिने 21-13 असा विजय मिळवला.

विशेष म्हणजे बॅडमिंटनमधील (Badminton) भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. टीम इंडिया आता 19 सुवर्णपदकांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. सुवर्णाबरोबरच भारताने 15 रौप्य आणि 22 कांस्यपदकेही जिंकली आहेत. आता भारताच्या खात्यात एकूण 56 पदके आहेत. या बाबतीत कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाची 26 सुवर्णपदके आहेत. तर ऑस्ट्रेलिया 66 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.