गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले

पुणे : गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि सनईच्या स्वरात गुरुवारी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. शासन आदेशानुसार घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे खुली झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांनुसार भक्तांची आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घेत दर्शनव्यवस्था करण्यात आली होती.

मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेत ठराविक अंतरावर पट्टे आखून भाविकांना उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या भाविकांनी मास्क घातला आहे, अशा भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला. भाविकांचे तापमान तपासणी करण्याकरीता व स्पर्शविरहित हात निर्जंतुकीकरण करण्याची सोय ट्रस्टतर्फे दर्शनरांगेमध्ये दोन वेळा करण्यात आली आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना शासन आदेशानुसार मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. भाविकांनी दर्शनासाठी येताना काय नियमावली पाळावी, याचे फलक देखील मंदिर परिसरात लावण्यात आले. हार, फुले, नारळ भाविकांकडून स्विकारण्यात येणार नसल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. तसेच नवरात्रीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.

मंदिरात श्रीमहाबुद्धि नवरात्रोत्सवाला प्रारंभ

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, नवरात्रोत्सवानिमित्त गणपती मंदिरात श्रीमहाबुद्धि नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. श्रीं ना नवरात्रीमध्ये दररोज विविध नाम असलेली उपरणे परिधान करण्यात येणार आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी बुद्धीपती हे नाम असलेले उपरणे श्रीं ना घालण्यात आले होते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात गाणपत्य संप्रदायात श्री महाबुद्धी नवरात्र संपन्न केले जाते. भगवान श्री गणेशांच्या उजव्या हाताला विराजमान असणा-या श्री गणेश शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. भगवान तिला आपल्या उजव्या हाताला स्थान देतात, यातच तिचे श्रेष्ठत्व अधोरेखित आहे. अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी सूर्यास्त समयी देवी बुद्धी प्रगट झाली असल्याने त्यादिवशी महाबुद्धी जन्मोत्सव संपन्न केला जातो. त्यामुळे अश्विन प्रतिपदा ते नवमी हे नवरात्र बुद्धी नवरात्र रूपात संपन्न होते.

ते पुढे म्हणाले, मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ आनंद म्हणजे ज्ञानाचा आनंद. ते जगातील ज्ञान विविध बोधांच्या आधारे होत असते. पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे जगातील विविध पदार्थांचा होणा-या त्या बोधाचा आधार असणारी शक्ती म्हणजे देवी बुद्धी. या बुद्धी नवरात्रामध्ये आपण देवी बुद्धींच्या नऊ नावांचे चिंतन करीत तिचे बौद्धिक अनुष्ठान करीत आहोत. ही बुद्धी भगवान श्रीगणेशांची अत्यंतप्रिय भामिनी असल्याने, ती भगवान गणेशांच्या कृपेने कार्य करीत असल्याने भगवान श्रीगणेशांना बुद्धिपती असे म्हणतात. त्यामुळेच श्रीं ना बुद्धिपती, वागीश्वरीश, महाविद्याधीश, शारदानाथ, प्रज्ञापती, सुमेधानाथ, भारतीभर्ता, ब्रह्मविद्येश, महाबुद्धीश आणि दस-याच्या दिवशी शमीविघ्नेश या नामांचे उपरणे परिधान करण्यात येणार आहे.

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे

www.dagdushethganpati.com

http://bit.ly/Dagdusheth-Live

iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App

Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App

या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा देखील जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

हे ही पहा: