Dahihandi : एकनाथ शिंदेंनी चोरून दहीहंडी फोडली – जयंत पाटील

पुणे – आपली दहीहंडी (Dahihandi ) सगळ्यांच्या समोर फुटत आहे. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोडलेली दहीहंडी गुप्तपणाने, चोरून, कुठेतरी जाऊन फोडली आहे, त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही, अशा शब्दात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.पुण्यातील धायरी येथे रुपाली चाकणकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील 50 थरांची हंडी फोडली होती. यादरम्यान त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या बोलण्याचा रोख हा शिवसेना (Shiv Sena) पक्षात झालेल्या बंडखोरीकडे होता.

याच भाषणावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले,आपली दहीहंडी पाहण्यासाठी किमान 15 ते 20 हजार लोक जमले आहेत. ही दहीहंडी सगळ्यांच्या समोर फोडली जात आहे. पण एकनाथ शिंदे यांनी फोडलेली दहीहंडी ही गुप्तपणाने, चोरून कुठेतरी जाऊन फोडलेली आहे. त्याला महाराष्ट्राची अजून मान्यता नाही, त्यामुळे ती काही खरी दहीहंडी नाही.