पोलिसांच्या वरदहस्तामुळे दानापुर मधील ‘दानव’मोकाट !

मुंबई : पोलिसांच्या वरदहस्तामुळेच दानापूर मध्ये दलितांवर अत्याचार करणारे ‘दानव’ मोकाट असल्याचा घणाघात बहुजन समाज पार्टी चे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी केला.अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर गावाला नुकतीच भेट देत त्यांनी गावातील पीडित दलित बांधवांची कैफियत ऐकून घेतली. स्थानिक प्रस्थांच्या अत्याचारामुळे पीडित बरीच दहशतीत आहेत. पंरतु, प्रशासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पंरतु, गावातील पीडित बांधवांच्या पाठीशी बसपा भक्कमपणे उभी आहे, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून जातीय भेदभाव करणाऱ्या ‘दानवां’सह दोषी अधिकारी आणि प्रकरणाकडे डोळेझाक करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई चे निर्देश गृहमंत्र्यांना द्यावेत,अशी मागणी देखील अँड.ताजने यांनी यानिमित्त केली.

सरकारने दानापूर प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी,अन्यथा बसपा राज्यभरात आंदोलन उभे करेल, असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी यानिमित्त दिला.सामाजिक नीतिमत्तेची मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करीत दलितांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर ऍक्ट्रोसिटी अंतर्गत कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून पीडितांना न्याय मिळवून दयावा,अशी मागणी अँड.ताजने यांनी केली. सर्व समावेशकतेसाठी समाज प्रबोधन, लोक चळवळीतून वैचारिक क्रांती ज्या राज्यात घडली, संत परंपरा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या राज्यात दलितांवरील अत्याचाराचा कळस गाठला आहे. दानापूर गावात दलितांच्या जगण्याचा अधिकार हिरवणाऱ्या घटने वरून हे अधोरेखित होत आहे. मग महाराष्ट्राला पूरोगामी कसे म्हणणार? असा सवाल अँड.ताजने यांनी उपस्थित केला.

दलितांवर अत्याचारात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे.महाविकास आघाडी सरकार असो अथवा भाजप चे सरकार. राज्यात शोषित, पीडित,उपेक्षितांना दुय्यम वागणूक दिली जाते. सर्वसमावेशक ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ चे लक्ष पूर्ण करण्यासाठी केवळ बसपाच पर्याय आहे. पीडितांवर अत्याचार करणाऱ्यांची बसपा गय करणार नाही, असा इशारा त्यांना यावेळी दिला.

प्रकरणाकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा !

दानापुरातील एका वहीवाटीच्या रस्त्यासाठी तहसीलदाराकडे करण्यात आलेली तक्रार गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. सातत्याने तहसीलदारांकडे पाठपुरावा करून देखील पीडित बांधवांना न्याय न मिळाल्याने ते व्यथित आहेत. अशातच १८ ऑक्टोबरला दानापूरच्या कथीतांनी निखिल चांदणे यांच्या शेतातील सोयाबीन जाळले.अद्याप ही या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली नाही. ऐन पेरणीच्या मौसमात ट्रॅक्टर अडवुन पीडित बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करण्याचा समाजविघातक प्रकार गावातील समाज कंटकांकडून केला गेला. प्रकरणी पोलिसांनी चौघांवर अ‍ॅट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल केले असले तरी अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यामुळे अँड.ताजने यांनी केली आहे.