स्वतःवर हल्ला होण्याचं भाकित करणाऱ्या संजय राऊत यांची दरेकरांनी उडवली खिल्ली 

मुंबई – 30 मार्च 2018 ला खासदार संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना  बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचाय. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्र घाबरणारा आणि झुकणारा नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. पण बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट रचला जात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, स्वतःवर हल्ला होण्याचं भाकित करणाऱ्या संजय राऊत यांचा हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. टीव्ही 9 शी फोनवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.कोर्टाने बोलावल्यानंतर कर्नाटकात संजय राऊत गेले आणि आले काय… त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. मात्र त्यांना सातत्याने प्रसिद्धीची सवय लागली आहे. साधेपणाने गेल्यावर प्रसिद्धी मिळणार नाही. त्यामुळे काहीतरी सनसनाटी वक्तव्य करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचे संजय राऊत यांचे हे केविलवाणे प्रयत्न असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.(Darekar criticized Sanjay Raut who predicted an attack on himself).