ऑस्ट्रेलियाला डबल झटका! दोन कसोटी गमावत पिछाडीवर असतानाच ‘हा’ धाकड खेळाडू मालिकेबाहेर

नवी दिल्ली- चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका (Border Gavaskar Test Series) खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या (Australia Tour Of India) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. नागपूरपाठोपाठ दिल्ली कसोटीतही त्यांचा पराभव झाला. आता संघाचा उपकर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर (David Warner Ruled Out) पडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १ मार्चपासून इंदोरमध्ये तिसरी कसोटी खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी वॉर्नर मालिकेतून बाहेर झाल्याने हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असेल.

दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजचा बाउन्सर डेविड वॉर्नरच्या हेल्मेटला लागला होता. यापूर्वी त्याच्या कोपरालाही चेंडू लागला होता. त्यानंतर दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात तो फलंदाजीसाठी आला नव्हता. मॅट रेनशॉ दुस-या कसोटीत वॉर्नरचा बदली खेळाडू म्हणून खेळला होता. वॉर्नरच्या एक्स-रे अहवालात असे आढळून आले आहे की, वॉर्नरच्या हाताच्या कोपऱ्यात हेअरलाइन फ्रॅक्चर आहे. म्हणूनच तो उर्वरित २ कसोटी खेळू शकणार नाही.

दरम्यान डेविड वॉर्नरसाठी आतापर्यंतचा भारत दौरा चांगला राहिला नाही. त्याने ३ डावात फक्त २६ धावा केल्या आहेत. आता तो इंदोर आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.