धक्कादायक : मद्यधुंद चालकाने महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच 15 मीटरपर्यंत फरफटत नेले 

Swati Maliwal : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कारमधून ओढून नेल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका मद्यधुंद कार चालकाने स्वाती मालीवाल यांना दिल्लीतील एम्सच्या गेट क्रमांक दोनसमोर 10 ते 15 मीटरपर्यंत ओढल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस कारवाई करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 3.11 वाजता घडली. एम्सच्या गेट क्रमांक दोनसमोर कार चालकाने स्वाती मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. मालीवाल त्याला खडसावत असताना कारचालक हरिश्चंद्रने कारची विंडशील्ड वर केली. यामुळे स्वाती मालीवाल यांचा हात गाडीत अडकला. यानंतर कार चालकाने त्यांना 10 ते 14 मीटरपर्यंत ओढले.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय हरिश्चंद्र मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी पदपथावर स्वाती मालीवाल आपल्या टीमसोबत उभ्या असताना ही घटना घडली.

या प्रकरणावर स्वाती मालीवाल यांचे ट्विटही आले आहे.  दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर काय परिस्थिती असेल याची कल्पना करा. दरम्यान, आता या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.