नवी दिल्ली- देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.
डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, शूर योद्ध्यांना मृत्यू हरवू शकत नाही. देशासाठी लढणारे जवान मरत नाहीत. ते अमर असतात. अमर जवान जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम देशवासियांना प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय सशस्त्र दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
तामिळनाडू मधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपीन राऊत;त्यांच्या पत्नी मधूलिका रावत आणि सशस्त्र दलाचे 11 अधिकारी यांचा मृत्यू झाल्याची दुःखद वार्ता ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.या दुर्घटनेत देशाचे पाहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे निधन झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराची शौर्याची परंपरा चालवीत देशसेवा केली.जनरल बिपीन रावत शौर्य, साहसीवृत्तीने आणि राष्ट्रभक्तीचे आदर्श उदाहरण होते. सर्वप्रथम म्यानमार मध्ये सर्जिकल स्ट्राईक जनरल बिपीन रावत यांनी केला होता. देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य गाजविणारे जनरल बीपीन रावत यांच्या निधनाने भारताने शूर आणि साहसी वीर गमावला आहे अशी शोकभावना आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.