शरद  पवारांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या,… 

मुंबई – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Death threat to Sharad Pawar) या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. मात्र, इतक्या खालच्या स्तरावर जाऊ नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.