आरोग्य क्षेत्रासाठी माझ्या जीवनाची शेवटची वर्षे समर्पित; रतन टाटा भावूक

गुवाहाटी – आसाममध्ये ७ हायटेक कर्करोग निदान रुग्णालयांच (Cancer Hospital) उद्घाटन झालं.उद्योगपती रतन टाटा यांनी आसाममधील कर्करोग रुग्णालयांच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगभरातून रतन टाटा यांच्यावर या घोषणेमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विनम्र आणि संयत वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा (Ratan Tata) यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्याला हिंदीत बोलता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मी इंग्रजीत बोलेन पण मनापासून बोलेन, असे त्यांनी सांगितले. वार्धक्यामुळे (old age) भाषण करताना रतन टाटा यांचा आवाज कापत होता, भाषण करताना त्यांना मध्येमध्ये थांबावे लागत होते. यावेळी रतन टाटा यांनी मी आयु्ष्याची शेवटची वर्षे ही आरोग्य सेवेसाठी समर्पित करणार असल्याचे सांगितले. रतन टाटा यांनी आपल्या या भाषणात आरोग्य व्यवस्थेच्या अनेक पैलूंना स्पर्श केला.

यावेळी रतन टाटा यांनी आपण आयुष्याची शेवटची वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी देणार असल्याचे सांगितले. कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी आसाममध्ये एकूण १७ रुग्णालये सुरु करण्याचा रतन टाटा यांचा मानस आहे. मुंबईतील कॅन्सर रुग्णालयांवर जास्त ताण येत असल्यामुळे टाटा यांनी असा निर्णय घेतला आहे.