नवाब मलिक यांच्या जामिनासाठी बिटकॉईनमध्ये ३ कोटींची मागणी, मुलगा फराजची तक्रार

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याने पोलिसात तक्रार दाखल केली असून एका व्यक्तीने वडिलांना जामीन देण्याच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याने व्हीबी नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे की, इम्तियाजी नावाच्या व्यक्तीने नवाब मलिक यांना जामीन मिळू शकतो असे म्हटले आहे. जामीन मिळवण्यासाठी त्याने फराजकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली आहे.

फराज मलिक म्हणतात की, त्याला इम्तियाजी नावाच्या व्यक्तीने ई-मेल केला आहे. ईमेलमध्ये नवाब मलिक यांच्या जामिनासाठी बिटकॉईनमध्ये ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. व्हीबी नगर पोलिसांचे म्हणणे आहे की ते हा ईमेल सायबर सेलला पाठवतील आणि आरोपींची माहिती मिळवतील. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहाराशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. २३ फेब्रुवारी रोजी मलिक यांना चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. त्यानंतर सुरुवातीला त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.