‘लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,मूलभूत हक्क ह्या सर्वांवर फक्त स्वतःला ’पत्रकार’ म्हणवून घेणाऱ्या लोकांचाच हक्क आहे का?’

 पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले. या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी एका फेसबुक पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात नेमकं काय म्हटलं आहे शेफाली वैद्य यांनी…

लोकशाही, भिडे गुरुजी आणि कुंकू

लोकशाही, भिडे गुरुजी आणि कुंकूलोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतीय घटनेने बहाल केलेले मूलभूत हक्क ह्या सर्वांवर फक्त स्वतःला ’पत्रकार’ म्हणवून घेणाऱ्या लोकांचाच हक्क आहे का? इतर कुणाला अधिकार नाहीये का हे ठरविण्याचा की त्यांनी कुणाशी व्यवहार करावा की करू नये?

काल संभाजी भिडे गुरुजींनी एका स्त्री पत्रकाराला सांगितलं की ‘प्रत्येक स्त्री ही त्यांना भारतमातेचं रूप वाटते आणि म्हणून तिने कपाळावर कुंकू लावून यावं, मग ते तिला बाईट देतील’. अपेक्षेप्रमाणेच मराठी प्रसारमाध्यमांनी ह्यावर राळ उठवली. तो धुरळा काही दोन-तीन दिवस खाली बसणार नाही.

उपमुख्यमंत्री फडणवीस ह्यांचे #HMV विधान वर्मी लागलेल्या काही मराठी पत्रकारांना आता संभाजी भिडे गुरुजींनी टाकलेले हे नवीन हाडूक दोन-तीन दिवस तरी चघळायला नक्कीच पुरेल. खरेतर गुरुजींना माझ्याच काय, कुणाच्याच समर्थनाची गरज नाही, त्यांच्या लढाया लढायला ते आणि त्यांचे धारकरी समर्थ आहेत, पण ह्या प्रकरणात जे वायफळ मुद्दे मांडून वाद भडकवण्याचा जो प्रयास चालू आहे त्याबद्दल थोडेसे.

पहिली गोष्ट, भिडे गुरुजी ह्यांचे विधान न आवडलेले बरेच लोक माझ्या मित्र परिवारातही आहेत आणि त्यांचे विधान न आवडणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला काय हवे ते कपडे घालायचा किंवा बिंदी लावायची की नाही हे ठरवायचाही घटनात्मक हक्क निर्विवाद आहे आणि त्याचे मी पूर्ण, १०० टक्के समर्थन करते. सर्व स्त्रियांनी सर्व काळ बिंदी/टिकली/कुंकू लावलंच पाहिजे तरच त्या हिंदू ठरतील असं मूर्ख विधान कुणीही कुठेही केलेलं नाही. मी तर नाहीच नाही.

#NoBindiNoBusiness ही चळवळ सुरु करताना देखील मी हे स्पष्ट केलं होतं की ज्याप्रमाणे जाहिरातदारांना हिंदू सणांना त्यांना हव्या त्या जाहिराती बनवायचा हक्क आहे त्याच प्रमाणे एक भारतीय नागरिक म्हणून मलाही हा हक्क आहेच हे ठरवायचा की माझे पैसे मी अश्याच उत्पादनांवर खर्च करेन जे हिंदू संस्कृतीचा, आपल्या सणांचा आणि आपल्या प्रतीकांचा आदर करतील. ही माझी वैयक्तिक भूमिका होती खरंतर, जी लोकांना पटली, आणि त्यातून एक चळवळ उभी राहिली, त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला ह्या दिवाळीत दिसला.

भिडे गुरुजींनी तरी वेगळं काय सांगितलंय? मी म्हटलं माझे पैसे कशावर खर्च करायचे हे ठरवणे हा माझा हक्क आहे, भिडे गुरुजी म्हणाले त्यांचा वेळ कुणावर खर्च करायचा हे ठरवणे हा त्यांचा हक्क आहे.

ती पत्रकार भिडे गुरुजींचा बाईट घ्यायला गेली होती, ती तिच्या कामाची गरज म्हणून. गुरुजी तिच्या मागे लागले नव्हते ’माझा बाईट घ्या, माझा बाईट घ्या’ म्हणून त्यामुळे ‘माझ्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होतेय’ हा निखळ कांगावा आहे. भिडे गुरुजी काही कुठल्याही संवैधानिक पदावर नाहीयेत, ते निवडून आलेले लोकप्रतिनिधीही नाहीयेत की त्यांना पॉलीटिकल करेक्टनेसची फिकीर असावी.

एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना कुणाशी बोलायचं आणि कुणाशी नाही हे ठरवायचा अधिकार त्याच संविधानाने दिलेला आहे ज्या संविधानाने त्या पत्रकार बाईला तिला हवे ते कपडे घालून कामावर जायचा अधिकार दिलेला आहे. ह्यालाच लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात आणि ते सिलेक्टिव असत नाही.

दुसरी गोष्ट, त्या पत्रकाराचं काम तिला हव्या त्या वेषात ती करतेय, खरी गोष्ट आहे पण तिच्या कामात तिला हवं तसं सहकार्य करायला भिडे गुरुजी बांधील नाहीत. ते तिचे बॉसही नाहीत आणि तिचे सहकारीही नाहीत त्यामुळे तिला योग्य ती बाईट देणं ही भिडे गुरुजींची जबाबदारी नाही. कामाचं आणि वेषाचंच म्हणाल तर उदया एखादा बिजीनेस जर्नलिस्ट म्हणाला की मी मुकेश अंबानींची मुलाखत घ्यायला पायात रबरी चपला, रंगीबेरंगी शॉर्ट्स आणि सिंगलेट घालून जाईन, तर ते शक्य होईल का? सिक्यूरीटीवाले लोक त्याला बाहेरूनच परस्पर हाकलून देतील!

तीसरी आणि शेवटची गोष्ट, जर समस्त मराठी पत्रकार विश्वाला भिडे गुरुजींच्या ह्या वक्तव्याने इतका संताप आला असेल तर त्यांचा निषेध म्हणून सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार घालून दाखवावा की. असं झालं तर मी विचारपूर्वक एक तात्विक भूमिका घेतली म्हणून मराठी पत्रकार विश्वाचं जाहीर अभिनंदन करेन आणि त्यांना पाठिंबा देईन.

पण TRPच्या ट्रॅप मध्ये अडकलेले मराठी पत्रकार असं कधीही करणार नाहीत कारण त्यांना चावून चोथा करायला, न्यूज चॅनेल वर चोवीस तास काहीतरी भडक दाखवून लोकांमध्ये फूट पाडायला असं काहीतरी सनसनाटी हवंच असतं, त्यामुळे पुढचे दोन दिवस हा तमाशा चालेल, मग दुसरी कुठली तरी बातमी येईल आणि समस्त पत्रकारांचा जथा तिथे चालला जाईल.

गावात कधी पाहिलंय का? रात्री निरव शांततेत कसला तरी छोटा आवाज येतो, एखाद्या घराच्या वळचणीला झोपलेलं एक कुत्रं भुंकायला लागतं, त्याचं ऐकून दुसरं, त्याचं ऐकून तिसरं, आणि पाच मिनिटात कोरस इतका जोरदार लागतो, की मनात नसलं तरी गाव चडफडत जागं होतं. मग काही वेळाने एकेक करत कुत्री आपोआपच शांत होतात, गाव परत झोपेच्या अधीन व्हायला लागतं. थोड्या वेळाने गावाच्या दुसऱ्या भागात कुठे तरी कसला तरी आवाज होतो आणि दुसरं एखादं कुत्रं भुंकायला लागतं आणि परत एकवार भुंकाभुंक सुरु होते. परत गाव चरफडत उठून बसतं. बस! हेच आहे. -शेफाली वैद्य