Shivsena : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे टर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. काल कामकाज सुरू होताच न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून येत्या मंगळवारी, 21 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
दरम्यान, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून न्यायालयानं गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.आमचं सरकार बहुमताचं आणि कायद्याने स्थापन झालेलं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशातील लोकशाही संपलेली आहे; हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे असं ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.