Department of Meteorology | राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं तसंच १९ जिल्हयातील उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्हयात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
आंबा, नारळ, फणस, काजू, केळी, द्राक्षे, पपई, लिंबू आदीसह भाजीपाला कांदा, मका, मिरची, तीळ तसंच भात, गहू, रब्बी ज्वारीच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
नैऋत्य मौसमी पाऊस यंदा ३१ मे च्या सुमारास केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या वर्षी आठ जून रोजी मान्सून केरळमध्ये आणि ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. हवामान विभागाच्या (Department of Meteorology) अंदाजानुसार, यंदा २८ मे ते ४ जून दरम्यान हा पाऊस दाखल होईल. दक्षिण अंदमानमध्ये येत्या रविवारपर्यंत मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप