Narendra Modi | स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत बोलताना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ,उद्योग मंत्री उदय सामंत,शालेय शिक्षण मंत्री,दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपा मुंबई अध्यक्ष,आशिष शेलार व महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांकरिता आयोजित प्रचार सभेत मोदी (Narendra Modi ) यांनी काँग्रेसी राजवटीचे अक्षरशः धिंडवडे काढले. काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी मुंबईची वाताहत करून मुंबईच्या विकासाला रोखून ठेवले, असेही ते म्हणाले. सत्तेसाठी नकली शिवसेनेने मुंबईला धोका दिला आणि ते वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कुशीत जाऊन बसले, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. ज्यांनी मुंबईची वाताहत केली, मुंबईकरांना वेठीला धरले, त्यांना आता हे क्लीनचीट देत आहेत. याहून मोठा धोका कोणता असू शकतो, असा सवालही त्यांनी केला.
धर्माच्या आधारावर आरक्षणास संविधान सभेचाही विरोध होता. पण इंडी आघाडीवाले धर्माच्या आधारावर आरक्षण वाटू पाहात आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा देत मोदी म्हणाले की आता मुंबईकरांची सर्व स्वप्ने, सर्व संकल्प खंबीरपणे पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. येत्या पंचवीस वर्षांचा विकासाचा आराखडा आमच्याकडे आहे, तर इंडी आघाडीच्या काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी केली, तर देशाचे दिवाळे निघेल. काँग्रेसची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. मंदिरांच्या संपत्तीवर आहे, आणि वारसांच्या संपत्तीवर आहे, या आरोपांचाही श्री. मोदी यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसची माओवादी विचारसरणी देशासमोरील मोठे संकट ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.मुंबई हे स्वप्ने जगणारे शहर आहे. स्वप्ने, संकल्प घेऊन येथे येणाऱ्या कोणासही या शहराने कधीच निराश केले नाही. मी देखील विकसित भारताचे स्वप्न, संकल्प घेऊन आज येथे आलो आहे. मुंबईला यासाठी मोठी भूमिका पार पाडायची आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, जगातील अनेक देश स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढे गेले, आपणच मागे पडलो, कारण या देशाच्या नेतृत्वाने कधी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वासच ठेवला नाही. देशाचे पंतप्रधानच जेव्हा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना आळशी म्हणत होते, जी सरकारेच असा विचार करतात, ते देशाला कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यानुसार जर काँग्रेस विसर्जित केली असती, तर आज भारत किमान पाच दशके पुढे गेला असता. भारताच्या सर्व व्यवस्थांचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे देशाची पन्नास वर्षे बरबाद झाली. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारत सहाव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था होता, 2014 मध्ये काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर गेली होती. गेल्या दहा वर्षांत आज देश जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती म्हणून उभा आहे.
आज भारतात, मुंबईत, विक्रमी गुंतवणूक येत आहे, आणि काही वर्षांतच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती झालेला असेल, ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला विकसित भारत दिल्याशिवाय जाणार नाही, याकरिता दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि देशासाठी समर्पित असेल, अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी दिली.नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्यांच्या मनात आशा निर्माण करणे अवघड असते. निराश लोकांना कोणतीच गोष्ट शक्य वाटत नाही. राम मंदिरदेखील त्यांना अशक्य वाटत होते, केव्हातरी जगाला हे वास्तव मान्य करावेच लागेल, की भारताची जनता आपले विचार, निर्धार आणि संकल्पावर एवढे ठाम होते, की एका स्वप्नासाठी त्यांनी पाचशे वर्षे अविरत संघर्ष केला आहे. पाचशे वर्षे उराशी बाळगलेले राम मंदिराचे स्वप्न आज साकार झाले आहे. याच नैराश्यग्रस्तांना कलम 370 रद्द करणेही अशक्य वाटत होते, पण आता या अडथळ्यास आम्ही कब्रस्तानात गाडले आहे. आता ते पुन्हा प्रस्थापित करण्याची हिंमत जगातील कोणतीही शक्तीकडे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :