‘लोकांना सांगे ब्रम्हज्ञान…’, अहो देसाई ! मराठी पाट्या बदलण्याची सुरवात तुमच्यापासून करा की…

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

एकीकडे या निर्णयाचे मराठीजणांकडून स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोसिएशनने मराठी पाट्यांच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे मराठी पाट्यांच्या निर्णयाविरोधात दोन प्रवाह दिसू लागले आहेत. या निर्णयात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचा मोठा वाटा आहे.

पण सरकारच्या दिव्याखालीच अंधार दिसत आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या ट्विटर हॅन्डलचा कव्हर फोटो मात्र ढळढळीत इंग्रजी भाषेत दिसत आहे. लोकांना सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण या उक्तीचा जिवंत अर्थ म्हणजे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आहेत असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. सामान्य मराठी दुकानदार मराठीच्या जाज्वल्य अभिमानापोटी दुकानावरील पाट्या बदलतील देखील पण मंत्र्यांनी आदेश काढताना आत्मपरीक्षण करणे देखील तितकेच गरजेचे आहे. आता तरी मंत्री महोदयांना जाग येऊन मराठी पाट्या बदलण्याची सुरवात स्वतःपासून करतील अशी अशा आहे.