नागपुरात शाहरूख खानजवळून देशी कट्टा जप्त

नागपूर : ताजनगर टेका येथील शाहरूख खान मो. शरीफ खान याच्या ताब्यातून नागपूर पोलीसांनी काडतुसासह देशी कट्टा जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टेका परिसरातील ताजनगर येथे राहणाऱ्या शाहरूख खानजवळ देशी बनावटीचा कट्टा असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली होती. सहायक निरीक्षक विजय कसोधन, संकेत चौधरी, पोलिस अंमलदार दीपक कारोकार, दिनेश चाफलेकर, चंदू ठाकरे, आशिष देवरे, साईनाथ डब्बा, उत्कर्ष राऊत आणि प्रफुल्ल पारधी यांनी शाहरूखवर करडी नजर ठेवली. शाहरूखच्या वागणुकीवरून पोलिसांना मिळालेली माहिती खरी असू शकते अशी जाणीव झाल्यावर त्याला यशोधरानगर हद्दीतून ताब्यात घेऊन अंगझडती घेतली.

या अंगझडतीत शाहरुखजवळ देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले असून, ११ हजाराचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे. सध्या तो यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे.आरोपी शाहरूख खान मोहम्मद शरीफ खान याचे वय २८ वर्ष असून, जप्त करण्यात आलेले पिस्तूल लोखंडी गावठी बनावटीचे आहे. लाकडी मुठीचे आवरण असलेल्या शास्त्रांची किंमत साधारणतः दहा हजार आणि काडतुसाची किमंत एक हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.