देवस्थान जमीन घोटाळा : भाजप आमदार सुरेश धस, माजी आमदार धोंडे यांची ईडीकडे तक्रार

मुंबई : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देवस्थानांच्या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. याबाबतची तक्रार सक्तवसूली संचालनालयाकडे (ED) देण्यात आली असून त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि माजी आमदार भीमराव धोंडेे (Bhimrao Dhonde) यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी हा जमीन घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी केला.

जो भाजप रामाच्या नावने राजकारण करतो त्या भाजपचे नेते प्रभू रामाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. विठोबाची जागा हडपत आहे. सात देवस्थानाची जागा हडप करून हजारो कोटी रुपयांची माया जमा करत आहेत. भाजपच्या माध्यमातून हे होत आहे. ईडी सारख्या संस्थेवर कोणीही अविश्वास दाखवत नाही. या दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थानांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला. वक्फच्या जमिनीचा तपास सुरू आहे. इतर सात प्रकरण एसआयटीकडे सोपवण्याची विनंती गृहखात्याला करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.