कराचा बोजा न टाकता विकास साधला पाहिजे – खा. बापट

खडकी –  नागरिकांवर कराचा बोजा न टाकता कॅन्टोन्मेंट बोर्डाने विकास साधला पाहिजे.अशी अपेक्षा खा.गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्त केली. खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की,ब्रिटिशांच्या काळात कॅन्टोमेंटची स्थापना झाली. देशाला स्वतंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे तशाच स्थितीत आहे. त्यांना आर्थिक अडचण आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी प्रशासनाने उत्पन्नाची साधने वाढवली पाहिजेत, नागरिकांवर कराचा बोजा न टाकता बोर्डाने विकास साधला पाहिजे. यावेळी सदन कमांडचे प्रमुख के. जे. एस. चौहान, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीअर डी. जी. पटवर्धन, उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार, विनीत नायर उपस्थित होते.

खासदार निधीतून तसेच केंद्राकडून बोर्डाला वेळोवेळी मदत केली जाते. मात्र सीएसआर च्या माध्यमातून खूप मदत मिळू शकते त्याचा उपयोग बोर्डाने केला पाहिजे असा सल्ला बापट यांनी यावेळी दिला. दरम्यान कॅन्टोमेंट दुरुस्ती कायदा संसदेत मांडला गेला असून त्याचा अभ्यास सुरु आहे अशी माहिती बापट यांनी यावेळी दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट येत असून सगळ्यांनी न घाबरता एकमेकांना मदत करून या संकटाचा सामना करण्याचा निश्चय करण्याचा संकल्प करू असे ही बापट यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला रुग्णालयातील स्टाफ, बोर्ड अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.