नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका; परीक्षा रद्द झाल्यानंतर फडणविसांचा घणाघात

 

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज आयोजित केलेल्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडिओद्वारे दिली.

विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा देखील मागितली. मात्र, अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसेच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

दरम्यान, यानिमित्ताने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत… आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!

किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!दोषींवर कठोर कारवाई कराच! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.