‘आमची पोल खोल यात्रा यशस्वी होत आहे, त्यामुळं त्यावर असे भ्याड हल्ले केले जात आहेत’

पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आज एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या ( Mumbai BJP )  पोल खोल रथाची तोडफोड केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई महापालिकेतील ( BMC) भ्रष्टाचाराची ( Corruption) पोल खोल करण्यासाठी आज भाजपने (BJP) आज एका सभेचं आयोजन केलं आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. मात्र तत्पूर्वीच भाजपच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात बोलताना ते म्हणाले, आमची पोलखोल यात्रा यशस्वी होत आहे. त्यामुळं त्यावर असे भ्याड हल्ले केले जात आहेत. सरकारला लक्षात येत आहे की आपल्या भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण बाहेर येत आहेत त्यामुळं हे हल्ले होत आहेत. आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत. कुणी किती जरी हल्ले केले तरी ही पोलखोल यात्रा थांबणार नाही.