अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात बनवला रिल? देवेंद्र फडणवीस ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Mumbai: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्यांचे आज मैं मूड बना लेया ए… हे गाणे प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला दाद दिल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ अली (Reel Star Riyaz Aly) याच्यासोबत आज मूड बना लेया ए गाण्यावर रिल तयार केलं. हे रिल सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले असून युझर्सनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

रिल स्टार रियाझ अली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ खुद्द अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या नव्या रिलची चर्चा आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. सहकारी बंगल्यावर अमृता फडणवीस यांनी हे रिल बनवल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्याबरोबरच युझर्सनी देवेंद्र फडणवीस यांनाही ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलवर आक्षेप घेतला आहे. ‘एबीपी’शी बोलताना त्यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रीयाझ अलीबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. तो रील व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात रील बनवण्यासाठी सरकारकडून लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का? हेदेखील त्यांनी रीलप्रमाणे व्हायरल करावं”.