मी पुन्हा येईन : देवेंद्र फडणवीस कमबॅक करण्याच्या तयारीत ?

कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात एकामागून एक भूकंप घडत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र शांत असल्याचे चित्र आहे. मात्र आता याच देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चंदगडमध्ये (Chandgad) बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केले. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून फडणवीस चंदगड तालुक्यातील निट्टूर (ता.चंदगड) येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसंच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केली.