आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही! – फडणवीस 

Mumbai – औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याची मागणी करण्यात येत होती.  आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.

दरम्यान, हे ऐतिहासिक पाऊल आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. आठ महिन्यांपूर्वी युतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. तसंच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून याच मुद्द्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा.. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा देवेंद्र जी! असं दानवे यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, आता अंबादास दानवे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले, अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.

त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही! असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.