राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, इतकी भाबडी अपेक्षा कशी ठेवली?

मुंबई – भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray)  पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांना पत्र लिहून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना या पत्रातून दिला आहे.

त्यानंतर आता यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंनी मविआ सरकारकडून याहून वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. एवढी भाबडी अपेक्षा कशी काय ठेवली? जे सरकार लांगुलचालन करतंय, हनुमान चालिसा म्हटल्यावर राजद्रोह लावून जेलमध्ये टाकतं त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं. या सरकारविरोधात आम्ही लढतोय, त्यांनीही लढावं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी पत्रात?

उद्धव ठाकरे,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सस्नेह जय महाराष्ट्र!

सर्व देशबांधवांना मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडालय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीर राज्य सरकारने कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांनाही पोलीस असे काही शोधत आहेत जणू काही ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत. अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे देश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझं एकच सामगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.

आपला-राज ठाकरे