‘बंद सरकारचा ढोंगीपणा उघड बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदत जाहीर करा’

मुंबई : महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे पूर्णत: ढोंगी सरकार आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. राज्यात 2000 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना ना कर्जमाफीचा लाभ, ना कोणती मदत. अशात त्यांना मदत देणे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे.

निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी बाध्य केले जात आहे. संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे. मावळमध्ये निष्पाप शेतकर्‍यांवर गोळीबार होतो, राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना लाठ्या-काठ्यांनी तुडविले जाते, तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या सरकारने सार्‍या योजना बंद केल्या, अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्षे बंदच पाळला. पण, आताकुठे थोडे उघडले, तर पुन्हा बंद. हे अख्खं सरकारच ‘बंद सरकार’ आहे. आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे.

मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि यांना खरोखर शेतकर्‍यांप्रति कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

हे देखील पहा